नवी दिल्ली/ मुंबई : राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते सुरू होती. भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली, तर भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती. मात्र, या चर्चेनंतरही शिंदे व पवार दोघेही भाजपने देऊ केलेल्या लोकसभेच्या जागांबाबत नाराज असल्याचे बोलले जात आहे. शहांशी चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम राहिल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शुक्रवारी महायुतीतील तीनही नेत्यांना दिल्लीला पाचारण केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही नेते शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिंदे आणि फडणवीस रात्री आठनंतर दिल्लीत आले. मात्र, शहा यांच्याबरोबर बैठक रात्री साडेदहानंतर सुरू झाली. या बैठकीला सुनील तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. शहांच्या बैठकीआधी अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.

हेही वाचा >>> निवडणूक रोखेप्रकरणी सोमवारी सुनावणी; न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँकेविरोधातही अवमान याचिका दाखल

भाजपने महाराष्ट्रातील संभाव्य मतदारसंघ आणि उमेदवारांच्या निवडीवर बुधवारी दिल्लीत कोअर ग्रुपच्या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे. महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटला नसल्याने भाजपने अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून भाजपच्या राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यासाठी समितीची बैठक होण्याआधी महायुतीतील जागावाटपावर सहमती घडवून आणण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेते प्रयत्नशील आहेत.

या जागांवरून तिढा

– पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी नऊपेक्षा जास्त जागांची मागणी केल्याचे बोलले जाते. मात्र, किमान लोकसभेसाठी तरी अजित पवारांना अपेक्षित जागा देण्याची भाजपची तयारी नसल्याचे सांगितले जाते.

– शिंदे गटानेही १३ जागांची मागणी केली असली तरी दहापेक्षा जास्त जागा देण्यास भाजप अनुकुल नसल्याचे समजते. शिवाय, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, ठाणे अशा काही मतदारसंघांवर शिंदे गट तसेच भाजपनेही दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाची गुंतागुत वाढली आहे.

– गजानन कीर्तीकर यांच्या वायव्य मुंबई मतदारसंघासह आणखी दोन मतदारसंघ आणि राष्ट्रवादीचे तटकरे यांचा रायगड मतदारसंघही भाजपला हवा आहे. उद्धव ठाकरे गटाकडे असलेले पाच मतदारसंघ; तसेच बारामती वगळता शरद पवार गटाचे खासदार असलेल्या अन्य जागा भाजपला हव्या आहेत.

‘घरवापसी’ची भीती

शिवसेनेच्या विद्यमान खासदारांसह काही इच्छुक नेत्यांना उमेदवारी नाकारल्यास ते उद्धव ठाकरे गटाकडे जातील. राष्ट्रवादीतील इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यास ते शरद पवार गटाकडे परत जातील. या ‘घरवापसी’ची भीती शिंदे-पवार यांना वाटत आहे. भाजपने शिंदे यांना शिवसेनेने गेल्या निवडणुकीत लढविलेल्या जागाही नाकारल्या आणि ते शिंदे यांनी मान्य केले, तर त्यातून शिंदे गटात चुकीचा संदेश जाईल व नेते नाराज होतील, अशी भीती आहे.

Story img Loader