राज्यात दहीहंडीच्या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई-ठाणे-पुण्यात दहीहंडीचे थरावर थर लावलेले पाहायला मिळत आहे. ‘प्रो गोविंदा’ स्पर्धेमुळे दहीहंडी पथके स्पर्धात्मक सादरीकरण करताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिवसभर भरगच्च कार्यक्रम असल्याचं त्यांच्या नियोजनावरून दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिवसभरात मुंबई-ठाणे व आसपासच्या तब्बल ३१ मंडळांना भेटी देणार आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ ठिकाणी हजेरी लावणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय विरोधकांनी केली होती टीका

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तारूढ होताच अवघ्या काही महिन्यात आलेल्या दहीहंडी व गणेशोत्सवात दोन ते तीन दिवस अनेक मंडळांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. राज्यातील इतर मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं सोडून मुख्यमंत्री उत्सव मंडळांना भेटी देत फिरत असल्याची टीका ठाकरे गटासह तेव्हाच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनीही केली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

कुठे असेल मुख्यमंत्र्यांची फिरस्ती?

आज दिवसभर सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दहीहंडी उत्सवांना भेटी देत आहेत. यामध्ये सर्वात आधी ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवाचा समावेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत आहे. त्यापाठोपाठ कोपरी, उथळसर, खेवरा सर्कल, संकल्प चौक, किसननगर, बाळकुंभ जकात नाका, वागळे इस्टेट, लुईसवाडी, स्वामी प्रतिष्ठान या ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कार्यक्रम

ठाण्यानंतर मुलुंड, ऐरोली, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी ईस्ट, बोरीवली वेस्ट, कांदिवली वेस्ट या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवांना भेटी देणार आहेत. त्यापाठोपाठ मीरा भाईंदर, मीरारोड, भुलेश्वर रोड, लालबाग, नायगाव, गिरगाव चौपाटी, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कार्यक्रम

देवेंद्र फडणवीस आज पुरंदरमध्ये!

देवेंद्र फडणवीस आज दुपारी पुरंदरच्या भिवडीमध्ये आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजल्यापासून मुंबईतील निरनिराळ्या दहीहंडी उत्सवांमध्ये ते हजेरी लावणार आहेत. यात बोरीवलीतील कोराकेंद्र ग्राऊओंड, मागाठणे, दहिसरमधील अशोकवन, ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील दहीहंडी, टेंभीनाका, संकल्प चौक तर घाटकोपरमधील श्रेयस सिग्नलजवळील दहीहंडी उत्सवाला ते भेट देणार आहेत. रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे हे दौरे चालू राहतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde devendra fadnavis dahi handi program visit in thane mumbai pmw