राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधक नागपुरात आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, अवकाळीची नुकसान भरपाई, बेरोजगारी, राज्याचा आर्थिक विकास अशा विविध मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. त्यामुळे अधिवेशनातलं वातावरण राजकीयदृष्ट्या कायमच तापल्याचं दिसत असताना गुरुवारी मात्र सर्व सत्ताधारी-विरोधक एकत्र एकाच फोटोफ्रेममध्ये येण्याचा मुहूर्त साधला गेला. या फोटोसेशननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेले हास्यविनोद सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारचं हे शेवटचं हिवाळी अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर विघानसभेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सर्वच आमदारांसमवेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फोटोसेशन केलं. या फोटोमध्ये सर्वच आमदार एका फ्रेममध्ये दिसत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे व माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण मात्तर काही कारणास्तव या फोटोसेशनला अनुपस्थित होते. हे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

शिंदे-फडणवीस थेट जयंत पाटलांकडे!

दरम्यान, हे फोटोसेशन झाल्यानंतर सर्व सदस्य एकमेकांशी चर्चा करण्यात रंगले असताना आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट जयंत पाटील जिथे बसले होते, तिथे गेले. त्यांच्यापाठोपाठ राहुल नार्वेकरांशी गप्पा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे गेले. जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सगळे या हास्यविनोदात सहभागी झाले होते. पण त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील समोर येऊ शकला नाही.

All party photo
नागपूर हिवाळी अधिवेशन सर्वपक्षीय फोटोसेशन

या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील यांच्यात बराच काळ हास्यविनोदांत चर्चा होत असल्याचं दिसून आलं. एकीकडे अधिवेशनात ही मोठी नेतेमंडळी एकमेकांवर आक्रमक टीका करताना दिसत असताना फोटोसेशनच्या निमित्ताने हास्यविनोदाच्या वातावरणात एकमेकांशी बराच काळ चर्चा करताना दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदारांच्या सामूहिक छायाचित्रावरून नाराजी, वेळ ठरवूनही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री….

अजित पवार अनुपस्थित!

दरम्यान, सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन होईपर्यंत शिंदे-फडणवीसांसमवेतच असणारे अजित पवार जयंत पाटलांकडे मात्र आले नसल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांच्या खुर्चीच्या दिशेने गेले असताना अजित पवार यांनी मात्र तिथे जाणं टाळल्याचं बोललं जात आहे.

शिंदे-फडणवीसांच्या अनुपस्थितीमुळे जयंत पाटलांची नाराजी

दरम्यान, फोटोसेशनच्या वेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्यामुळे जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन पार पडलं.