ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – Shivsena Party Symbol: ठाकरे गटाला मोठा धक्का! दिल्ली हायकोर्टाने फेटाळली याचिका
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. न्यायालयात ज्या आवश्यक बाबी आणि कागदपत्रांची पूर्तता करायची होती. ती आम्ही केली होती. त्यामुळे न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचं मी स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा – “तर ती महिला माझ्या अंगावर पडली असती, अन्…,” जामीन मिळताच आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले “सगळं ठरलं होतं”
तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटात ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान, हा वाद सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना पक्षनाव आणि चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह हंगामी गोठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होते.