बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी (१ जुलै) साम टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”
“अपघात कशामुळे झाला याची चौकशी होईलच”
“अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल,” अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.
हेही वाचा : Buldhana Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, २५ प्रवासी जागीच ठार
नेमकं काय घडलं?
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : लोकजागर : मृत्यूचा ‘समृद्ध’ महामार्ग!
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून उलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.