महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली. इतकंच नाही, तर प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात विल्हेवाट लावली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली. याप्रकरणी दिल्ली पोलीस कसून तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रकारांनी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१६ नोव्हेंबर) मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “श्रद्धा वालकरची हत्या दिल्लीत झाली आहे. ही खूप दुर्दैवी घटना आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिल्ली पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.”
“कृपया गैरसमज करून घेऊ नका”
प्रकाश आंबेडकरांच्या भेटीविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती.”
“बाबासाहेबांचं वास्तव्य असलेली वास्तू पाहिली”
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं भूषण आहे. त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली आणि सदिच्छा भेट दिली,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
“या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही”
“या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.