गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे गट आणि भाजपासमवेत सरकारमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मध्यंतरी अजित पवार गायब असल्याच्याही अफवा उठल्या होत्या. मात्र, त्यानंतर खुद्द अजित पवारांनीच त्यावर खुलासा केल्यामुळे या चर्चांवर पडदा पडला. मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार मविआतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्याबाबत दावे-प्रतिदावे!
अजित पवारांसंदर्भात चालू असलेल्या या चर्चांमध्ये राजकीय नेतेमंडळी वेगवेगळे दावे करून या चर्चांना खतपाणी घालताना दिसत आहेत. एकीकडे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ देऊ केली. त्यापाठोपाठ भाजपा आणि शिंदे गटाकडून निरनिराळे दावे करण्यात आले असताना संजय राऊत यांनी मात्र “अजित पवार प्रमुख नेते आहेत, ते असं पाऊल उचलणार नाहीत”, अशा आशयाचं विधान केलं आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
गुलाबराव पाटलांचं सूचक विधान
शिंदे गटाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “बरेच आमदार त्यांच्यासोबत आहेत. पण बघुयात. कारण कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. आणि ती तिथी येतेय. पण असं असलं तरी अजून कुळ बघावं लागेल, गुण जुळावे लागतील. मग ते काम करावं लागेल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
सुडाच्या राजकारणाची राज्याची संस्कृती नाही – उद्धव ठाकरे</p>
“सध्या अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत”
दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार असतील? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यार अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. “सध्या अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ते म्हणतील तो आकडा बनेल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.