राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील काही अस्वस्थ आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे येणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यामध्ये सर्वात आधी आमदार संजय शिरसाट यांचं नाव घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात केलेल्या विधानामुळे या चर्चांना अधिकच खतपाणी घातलं गेलं आहे. या पार्श्वभूमीवर आता खुद्द संजय शिरसाट यांनीच यावर स्पष्टीकरण दिलं असून सुषमा अंधारे यांनी याबाबत केलेल्या विधानावरून खोचक टोलाही लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ असल्याचं विधान पत्रकारांशी बोलताना केलं. “संजय शिरसाट सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागलेली नाही. उलट संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि संदीपान भुमरे अशा तिनही लोकांना मंत्रीपद मिळाल्यामुळे संजय शिरसाठ यांची मंत्रीपदाची आशा मावळली आहे. त्यामुळे आता सगळ्याच जास्त पश्चात्ताप संजय शिरसाठ यांना होतोय”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

बच्चू कडू-राणा वादावरून सुषमा अंधारेंचे भाजपावर टीकास्र; म्हणाल्या,“बच्चू कडूंची कारकीर्द…”

संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण

संजय शिरसाट यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सुषमा अंधारे यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. “आमच्या ताई सुषमा अंधारेंनी भावाबद्दल चांगलं वक्तव्य केलं त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून मला बरं वाटलं. पण अशी कोणतीही नाराजी माझ्यात नाही. मी नाराज नाही. याबाबत अनेक वेळा मी बोललोय. सध्या माझ्या नाराजीचं काही कारणच नाहीये”, असं संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

“योग्यवेळी मुख्यमंत्री निर्णय घेतात”

दरम्यान, मंत्रीपदाविषयी विचारणा केली असता नाराज नसल्याचं सांगणाऱ्या संजय शिरसाटांनी मंत्रीपदाविषयी सूचक विधान केलं आहे. “मी वेटिंगवर आहे म्हणजे काय? एखाद्या मंत्रीमंडळाचा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो, तेव्हा योग्य वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तो निर्णय घेत असतात”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde group sanjay shirsat mocks shivsena sushma andhare pmw