राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपलं आणि नागपूरमध्ये सुरू असलेला राजकीय आखाडा शांत झाला. मात्र, त्यानंतरही अधिवेशनातील आरोप-प्रत्यारोपांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांना जुनं उकरून ना काढण्याचा सल्ला दिला. तसेच, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते असं अजित पवार म्हणाले. यावर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
“मागच्या काळात झालं ते गंगेला मिळालं. आता ते कशाला उकळत बसायचं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघत नाही. नव्या वर्षात राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही निर्णय घ्या की ‘हे कुणी काही बोलत असतील तर माझे प्रवक्ते वगैरे त्यावर बोलतील’, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले. तसेच, यावेळी बोलतानात्यांनी संभाजी महाराजांचाही उल्लेख केला. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली”, असंही अजित पवार म्हणाले.
शंभूराज देसाईंचे अजित पवारांना सवाल
दरम्यान, अजित पवारांना प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाईंनी इतिहासातील हवाला दिला. “मोगलांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस त्यांचे हाल केले. पण संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं. पण त्यांनी धर्म सोडला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक का म्हणायचं नाही? दादांना हे मान्य नाही का? की दादांना असं वाटत होतं की धर्मासाठी संभाजी महाराजांनी केलेलं बलिदान योग्य नाही?” असा सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला.
“अजित पवारांना हे लक्षात येईल की…”
“हिंदू धर्मासाठी ज्या माणसाने ४० दिवस हाल सोसले. अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपुरुषांबद्दल सरकारमधले मंत्री, पदाधिकारी काय बोलतात याबद्दल अजित पवारांनी त्वेषाने भाषण केलं. सुरुवातीचं ते भाषण आणि अधिवेशन संपतानाचं हे भाषण.याचा अर्थ लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण असं अजित पवारांचं वक्तव्य आहे. महाराष्ट्रात या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. दादांना लक्षात येईल. की आपण बोललो ते चुकीचं आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्यावरूनही शंभूराज देसाईंनी टीका केली. “आम्ही उत्तरं देतोय. तुम्हीच बोलतायत. खोके सरकार कोण म्हणतंय? तुम्ही काहीही म्हणायचं आणि आम्ही बोलायचं नाही हे होणार नाही. तुम्ही आरे केलं की आम्ही लगेच त्याला कारेनं उत्तर देणार. तुम्ही आम्हाला हिणवायचं, टीका करायची, कुठल्या मार्गाने कसे गेलात हे सहा महिन्यांपूर्वीचं उकरून काढायचं. काल एकनाथ शिंदेंनी सांगितलं ‘मी शांत आहे म्हणून ठीक आहे. नाहीतर माझ्याकडची माहिती फार दूरपर्यंत जाणारी आहे’. या एका वाक्यात एकनाथ शिंदेंच्या मुद्दयांचा सारांश आलाय. आम्ही शांत आहोत, तोपर्यंत आम्हाला शांत राहू द्या, आमच्या सहनशीलतेचा अंत झाला, तर ज्या गोष्टी पुढे येतील, त्यातून अनेक लोकांची पायाखालची वाळू सरकेल”, असंही देसाई म्हणाले.