मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी भंडारा येथे झालेल्या जाहीरसभेतून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यात आपल्या सरकारने अनेक विकासकामं केली आहेत. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, राज्यातील विद्यमान सरकार काम करणारं सरकार आहे, हे सरकार केवळ अडीच-तीन महिन्यातच एवढी कामं करू शकते, तर पुढच्या दोन-सव्वा दोन वर्षात किती कामं करेल, यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
हेही वाचा- “…फक्त डोळ्यात अश्रू येणं बाकी होतं” अटकेनंतर घडलेल्या घडामोडींवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
भंडारा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विधानाचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले, “जसं नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे ५० खोके देत नाहीत तर २०० खोके देतात, हे पैसे विकास कामांसाठी देतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, आज सकाळपासून आतापर्यंत २०० कोटीहून अधिक रुपयांची भूमीपूजनं आणि लोकार्पणं केली आहेत. १०० कोटी रुपये केवळ पाईपलाईन प्रकल्पासाठी खर्च झाले आहेत.”
समृद्धी महामार्ग भंडाऱ्यापर्यंत नेणार- मुख्यमंत्री
“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा आहे. पण आपले आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आपल्या खासदारांचा आग्रह आहे की, समृद्धी महामार्ग पुढे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे हा महामार्ग आम्ही भंडाऱ्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे” अशी माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.