मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खेड येथील सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर कसे गेले? त्यांना मुख्यमंत्री पदाचा मोह कसा झाला? यावर टीकास्र सोडलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी मीडियासमोर डोळा मारला होता, त्या कृतीचा दाखला देत उद्धव ठाकरेंना सावध केलं.
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून भाषणात म्हणाले, “ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दूर ठेवलं. त्यांच्याबद्दल काय- काय वाक्य बाळासाहेंबांनी बोलली होती? त्यांची काय भूमिका होती? ती आपण सगळ्यांनी पाहिली. पण अशा काँग्रेसच्या राहुल गांधींना तुम्ही देशाचे पंतप्रधान करायला निघालात. जो आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकत नाही, तो या देशाचा पंतप्रधान कसा बनू शकतो? जो राज्य जिंकू शकत नाही, तो देश कसा जिंकू शकतो?”
हेही वाचा- “…तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला वेळ लागणार नाही”, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं सूचक विधान!
“अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि नातू मतं मागतो, यापेक्षा या राज्याचं दुसरं दुर्दैव काय असू शकतं? अशी परिस्थिती तुम्ही याठिकाणी आणली. तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुम्ही म्हणाले होते, शिवसैनिकाला पालखीत बसवेन. तुम्ही म्हणाले होते, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणालात शरद पवारांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. पण अशा प्रक्रियेत काहीही लपून राहत नसतं. या प्रक्रियेत असणारे सगळे लोक माझ्या परिचयाचे होते. तुम्हालाच सत्तेचा मोह झाला. तुम्हाला खुर्चीची भुरळ पडली. तुम्ही ते वदवून घेतलंत. आनंद आहे,” असं एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले.
हेही वाचा- “सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
“पण तुम्ही जेव्हा हिंदुत्वाबद्दल मूग गिळून गप्प बसलात. आपल्यासमोर अनेक विषय आले. सावरकरांचा विषय आला, दाऊदचा विषय आला, हिंदुत्वाचे विषय जेव्हा आले, तेव्हा तुम्ही भूमिका बदलू लागला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायलाही तुमची जीभ कचरू लागली, यापेक्षा दुर्दैवं अजून काय असू शकतं?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला.
हेही वाचा- “योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो” भरसभेतून उदय सामंतांची कबुली
“सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याबद्दल तुमचं मत काय होतं? हे आपण व्हिडीओमध्ये पाहिलं. शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात, कृषीमंत्री म्हणून यांनी काय दिवे लावले? मग २०१९ नंतरच्या निवडणुकीनंतर काय दिवे लागले? तुमच्या डोक्यात त्यांनी सत्तेचा आणि मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बिघडलं. जे वाईट होते ते चांगले झाले. तुम्ही सगळं विसरून गेलात. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना तुम्हीच म्हणाला की, यांनी शेण खाल्लं. मग आता त्यांच्या पंक्तीत बसून तुम्ही काय खात आहात? हे सांगा…” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी टीका केली.
हेही वाचा- ठाकरे गटातील नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स? रामदास कदमांचा मोठं विधान, म्हणाले…
अजित पवारांनी मीडियासमोर डोळा मारल्याच्या घटनेचा उल्लेख करत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “काल-परवा मीडियावर बाईट देताना, कोण कुणाला डोळा मारत होतं? ते आपण पाहिलं. अजित पवारांनीच डोळा मारला ना? हे सगळं काय चाललंय. जे आता गळ्यात गळा घालतायत, ते उद्या तुमचा कधी गळा दाबतील ते कळणारही नाही. त्यांचा पूर्वेतिहास तपासून बघा.”