सत्तांतरानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाले असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसयांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा प्रणित सरकार असले तरी अद्याप मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) जाहीर करण्यात आलेले नाही. असे असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या ३८ मंत्र्यांपैकी भाजपाला २५ तर शिंदे गटाच्या वाट्याला एकूण १३ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> “जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थाळावर याबाबतचे सविस्तर वृत्त देण्यात आलेले आहे. या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे. यामध्ये २५ मंत्री भाजपाचे (BJP) तर १३ मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे असतील. भाजपा पक्षाकडून बंहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगमी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल? कोणती खाती भाजपाला दिली जातील? याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा >>> “मी काय लोटांगण घालणार आहे का? त्यांच्या…”, संजय राऊतांचा दावा संदीपान भुमरेंनी फेटाळला, दिलं जाहीर आव्हान!
दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आमचे सरकार काम करणार आहे. तसेच राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठीही हे सरकार रात्र आणि दिवस एक करेन, अशी ग्वाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली होती. मुख्यमंत्रीदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ जवळ झालेल्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश आज दिले. मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे सहायक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी शिंदे यांनी दर्शवली आहे.