ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’वर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीश संवाद साधत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं” असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा- मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “आम्ही…”
आदित्य ठाकरे यांच्या विधानानतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बंडखोरीबाबतचा आरोप-प्रत्यारोपाचा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बुधवारी (१२ एप्रिल) अजित पवार लवकरच भाजपाबरोबर जातील, तसेच शिंदे गटाचे १५ आमदार अपात्र ठरतील असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे प्रकरण ताजं असताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मोठं विधान केलं आहे.