मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रियेनंतर कीर्तीकर आपल्या निवासस्थानी परतले आहेत. शिंदे यांनी कीर्तीकरांच्या तब्येतीची विचारपूस करत राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा- ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “ही लढाई…”
शिंदेसोबत समर्थक आमदारही उपस्थित
गेल्या आठवड्यात कीर्तीकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती. रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्यांना तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. शस्त्रक्रियेनंतर कीर्तीकर आपल्या घरी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी शिंदेसोबत आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
आमदारांनंतर शिवसेनेच्या खासदारांचेही बंड
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. आमदारांसोबत शिवसेनेच्या १२ खासदारांनीही बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एवढचं नाही तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी करत गटनेता बदलण्याबाबत पत्रही दिले आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेसह शिवेनेच्या १२ खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी खासदार राहुल शेवाळी यांनी आपली भूमिका मांडली आहे.