मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयाऱ्यांनाही शपथपत्रावर आरक्षण दिलं जावं, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबाबत केलेली घोषणा लोकांची दिशाभूल करणारी आहे, असं परखड मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडलं आहे.
उल्हास बापट म्हणाले, मी मघाशी एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं आणि लिहूनही घेतलं. त्यावेळी ते म्हणाले, ओबीसींना हात न लावता कायद्यात बसणारं आणि कायम टिकणारं म्हणजेच ५० टक्क्यांच्या वरचं आरक्षण देऊ. मला असं वाटतं की ही जनतेची दिशाभूल आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगणं की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन असा निर्णय घेऊ शकतो, हे योग्य नाही. आता ही सगळी लढाई सर्वोच्च न्यायालयात जाणार. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. यामधून खूप प्रश्न निर्माण होत आहेत. सगेसोयरे या शब्दाची व्याख्या कशी करणार? हादेखील एक मोठा प्रश्न आहे.
घटनातज्ज्ञ बापट म्हणाले, मी काही मराठा नेत्यांना सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर आपल्याला ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडावी लागेल. त्यासाठी मराठा हा समाज मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा ६५ टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तसं आरक्षण देता येत नाही. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घ्यावं लागणार होतं. मराठा समाजाने तशी मागणी करणं गरजेचं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी तोच धागा पकडून आंदोलन केलं. तसेच, मराठा समाज मागास आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळेच हा ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण झाला आहे.
हे ही वाचा >> ‘सगेसोयरे शब्दामुळे आरक्षणाचा गुंता वाढणार’, कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, जोपर्यंत…
दरम्यान, सगेयोयरे या शब्दावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, सगेसोयरे शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोवर सगेसोयरे या शब्दामुळे आरक्षणामधला गुंता आणखी वाढू शकतो. मराठी भाषेत ‘सगेसोयरे’ या शब्दाची व्यापक व्याख्या आहे. त्यामुळे याची व्याख्या करताना सरकारला निश्चित करावे लागेल की, जवळचे नातेवाईक की एका गावातील जवळचे लोक? कारण एकाच गावातील रहिवाशांना बाहेरच्या ठिकाणी आमचे ‘सगेसोयरे’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात, असे नाही.”