महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून विरोधकांनी आक्रमकपणे मुद्दे मांडण्याची एकही संधी सोडलेली नाही. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज सत्ताधाऱ्यांवर टीका करताना अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात अजित पवारांसह विरोधी पक्षांवर कधी खोचक तर कधी आक्रमक शब्दांमध्ये टीका केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना त्यांनी केलेल्या एका जुन्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून टोलेबाजी!

अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना धरणातील पाण्याच्या मुद्द्यावरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. एका जाहीर सभेत शेतकऱ्यांनी पाण्याच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला असता अजित पवारांनी त्यावरून त्यांच्या शैलीत “धरणात पाणी नाही तर तिथे मी काय ***?” असा जाहीर सवालच केला होता. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर अखेर अजित पवारांनी एक दिवसाचं उपोषण करत आत्मक्लेश केला होता.

दरम्यान, बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा अजित पवारांचं हे विधान थेट विधानसभेत चर्चेला आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवारांना त्यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली.”अजितदादा, तुम्ही काल बोलले, की मी आता चुकत नाही. मी आता काळजी घेतो. पण जेव्हा शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा आपल्या तोंडून काहीतरी निघून गेलं. तेव्हा तुम्हाला आत्मक्लेश करायला कुठे जावं लागलं?” असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी केला.

विश्लेषण: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, पण अजित पवारांनी सांगितला वेगळाच नियम; नेमकी काय आहे तरतूद?

अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा

यावर बोलताना अजित पवारांनी समोरच्या बाकावरून बसल्या बसल्याच “आत्मक्लेश केला ना” असं म्हटल्यानंतर त्यावरही “मी चुकीचं नाही सांगत. तुम्ही केला आत्मक्लेश”, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर अजित पवारांनी “कुठं १८५७चा विषय काढताय?” असा प्रश्न केला. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी लागलीच “१८५७ नाही हो दादा. तुम्ही तर आता आमचं पार ५० वर्षांपूर्वीचं काढायला लागले. आम्ही काढत नाही ते”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.

“हा ठराव निलंबनाचा नसून अविश्वासाचा आहे, त्यासाठी..”, राहुल नार्वेकरांविरोधातील ठरावाबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितला नियम!

“मी कधीही तुम्हाला वाईट बोलणार नाही. आत्मक्लेश करणं याचा अर्थ वाईट नाही. माणूस जेव्हा चुकतो, तेव्हा जो चूक सुधारतो तो त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा असतो. तो भविष्यात चुकत नाही. पण एक माणूस चुकतो. दोन, पाच, दहा माणसं चुकू शकतात. पण ५० माणसं चुकीचे आणि मी बरोबर हे असं कसं होऊ शकतं? तुमच्याबद्दल नाही बोलत मी. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही काळजी घेता आता. चांगली बाब आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde mocks ajit pawar in maharashtra assembly winter session pmw