परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र राज्यात दिसत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”
अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. “परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे बळीराजाचं सरकार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. एनडीआरएफच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची नुकसानभरपाई आपण दिलेली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नाना पटोलेंच्या ‘त्या’ विधानाचा समाचार!
दरम्यान नाना पटोलेंनी राज्यपालांच्या भेटीसंदर्भात केलेल्या विधानाचा एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला. “दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुख्यमंत्री त्यावर आधी हसले आणि नंतर खोचक टोला लगावला.
“दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन…”, सरकार बडतर्फ करण्याबाबत नाना पटोलेंनी मांडली भूमिका!
“हे भाष्य हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात मोठं बहुमत असलेलं भक्कम पाठिंब्याचं सरकार स्थापन झालं आहे. तीन महिन्यांत आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा ३९७ जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. आमच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाला २४३ जागा मिळाल्या आहेत. इतरही येऊन भेटत आहेत. या यशामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष बोलतच असतो. विरोधी पक्ष टीका करत आहेत. पण त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.