एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट फुटून बाहेर पडला आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील अद्याप राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. अर्थात मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली जात आहे. यामध्ये शिवसेनेचा देखील समावेश आहे. यावरूनच संजय राऊतांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिटोला लगावला आहे. ‘सह्याद्री’वर झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली. यावेळी, औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर खोचक प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना मंत्रीमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका केली. “हे सरकारच बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रीमंडळ शपथविधी होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एक दुजे के लिए आहेत. हा नवीन सिनेमा महाराष्ट्रात सुरु झाला आहे. या सिनेमाचा शेवट काय झाला होता हे आपण पाहिले असेल. सध्या सुरु असलेल्या सिनेमाचा राजकीय अंतसुद्धा त्याच पद्धतीने होईल. ही राजकीय आत्महत्याच आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“मला तेवढंच काम नाहीये”
संजय राऊतांच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकारांनी यासंदर्भात विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, आता त्यांच्यावर मला बोलण्याची आवश्यकता नाही. कारण रोज सकाळी उठून तेच काम असतं त्यांना. मला तेवढंच काम नाहीये”, असं शिंदे म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
“मंत्रीमंडळ काय, लवकरच होईल”
“आम्ही पूरस्थितीत दोघंही फिरतोय. गडचिरोलीत गेलो, तिथे काम सुरू आहे. सकाळी उठून आम्ही सगळे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी बोलतोय. तेलंगणा, कर्नाटकशी बोलतोय. पूरस्थितीत कुणाचंही नुकसान होऊ नये, त्यांची काळजी घेतली जावी हे सगळं करतोय. आम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्णय कुठेही थांबलेले नाहीत. मंत्रीमंडळ काय, लवकरच होईल”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.