महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यभरात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी लिफ्टजवळ आल्यानंतर त्यांनी एकाच लिफ्टमधून वरचा मजला गाठला. मात्र, त्यांच्या या एकत्र केलेल्या ‘प्रवासा’मुळे पुन्हा एकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे व भाजपा पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
विधिमंडळात नेमकं काय घडलं?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेही विधिमंडळात दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे एकाच वेळी लिफ्टजवळ आले. त्यावेळी संवादांची देवाण-घेवाण झाली. त्यानंतर या दोघांनी एकत्रच लिफ्टमधून विधिमंडळाचा वरचा मजला गाठला. या काही मिनिटांच्या ‘सोबती’मध्ये या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. त्यांच्या राजकीय ‘एकी’बाबतही शक्यता वर्तवल्या जात आहेत.
एकनाथ शिंदेंचा टोला!
दरम्यान, या घटनेबाबत एकनाथ शिंदे यांना माध्यम प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांनी त्यावर टोला लगावला. “लिफ्टमध्ये एकत्र गेल्यामुळे काही होईल असं वाटतंय का तुम्हाला? कुणी लिफ्ट मागितली, तरी सहाव्या मजल्यापर्यंत काही ती लिफ्ट पोहोचू शकणार नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे, म्हणजे ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाकडून आज लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. “काही लोक बोलतायत, काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत, काही मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून पेढे वाटतायत. भाजपाच्या २४० जागा आल्या, इंडिया आघाडीच्या सगळ्यांच्या मिळूनही तेवढ्या झाल्या नाहीत. म्हणून काही लोक आनंदाने पेढे वाटत आहेत बहुधा. गिरे तो भी टांग उपर असं झालंय. तुमचा देशातल्या जनतेनं पराभव केला आहे. एवढा अपप्रचार करून, राज्यघटना बदलणार, आरक्षण जाणार असं भीतीचं वातावरण करूनही जनतेनं मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं याचा आनंद विरोधक साजरा करतायत याचा आम्हाला आनंद आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“बांद्रा ते बांदा कधी पाहिलंय का त्यांनी?”
“शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं विचारलं गेलं. त्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार इन्सेंटिव्ह द्यायचं जाहीर केलं होतं. ते त्यांनी दिले नाहीत. आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा केले. मग शेतकऱ्यांना कुणी फसवलं? शेताच्या बांधावर जाणारे आम्ही लोक आहोत. बांद्रा ते बांदा कधी पाहिलंय का त्यांनी? शेतकऱ्याचं दु:ख कसं कळेल? त्यासाठी शेतावर जावं लागतं, चिखल तुडवावा लागतो, इर्शाळवाडीसारख्या ठिकाणी जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत. वर्क फ्रॉम होम करून चालत नाहीत”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
© IE Online Media Services (P) Ltd