विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांना राज्यातील विविध प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारी विरोधकांना उत्तर देत आहेत. असे चित्र अधिवेशनात पाहायला मिळत असताना कधी कधी सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधकांबाबत मिश्किल टिप्पणी करताना पाहायला मिळतात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. “जयंतराव तुम्ही तिकडे नकली (खोट्या) वाघांबरोबर आहात, पण इकडे असली (खऱ्या) वाघांबरोबर या”, असं म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना खुली ऑफरच दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

शालेय गणवेशाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “क्वालीटी बघा” आणि मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत नवा आणि जुना शालेय गणवेश दाखवला. ते पुढे म्हणाले, “आपल्याला लहान मुलांच्या गणवेशात आणि शालेय पोषण आहारात कोणतीही तडजोड करायची नाही. त्यामध्ये जर कोणी कॉप्रोमाईज करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जो यामध्ये भष्ट्राचार करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल”, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात बोलताना दिला.

हेही वाचा : अंबादास दानवेंच्या कारवाईच्या प्रस्तावावरील चर्चेला सत्ताधाऱ्यांचा नकार; विरोधकांचा सभागृहात गोंधळ, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नवर शिंदे काय म्हणाले?

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या सरकारने ठोस पाऊल उचललेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ समुपदेशकांची फौज उभी केली आहे. २०२२ मध्ये सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. आपण एकमताने ठराव करूनही पाठवलेला आहे. १४ डिंसेबर २०२२ रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी एक बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा एकत्र बैठकीसाठी आम्ही आग्रह धरणार आहोत. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या आंदोलनामधील हुतात्म्यांना १० हजार रुपये देण्यात येत होते. त्यामध्ये आता वाढ करून २० हजार करण्यात आले आहेत”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

जयंत पाटलांना ऑफर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोपरखळ्या लगावल्या. यावेळी जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात कधी आणणार? असं विचारलं. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात ब्रिटनमधी त्या संग्रहालयाबरोबर करार केलेला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार तिकडे जाऊन आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरच वाघनखं पाहायला मिळतील”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे जयंत पाटलांना म्हणाले की, “जयंतराव तुम्ही तिकडे नकली (खोट्या) वाघांबरोबर आहात, इकडे असली (खऱ्या) वाघांबरोबर या. जयंत पाटील हे माझे मित्र आहेत”, असा मिश्किल टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde offer to ncp jayant patil in maharashtra vidhan sabha monsoon session 2024 gkt