मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेक नेत्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकरांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंपर्यंत आणि उद्योगपती मुकेश अंबांनीपासून आमदार प्रसाद लाड यांच्यापर्यंत अनेकांच्या घरी शिंदे मागील काही दिवसांमध्ये गणेश दर्शनासाठी जाऊन आले आहेत. यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही गणपती दर्शनाला गेले होते.
याच मुद्द्यावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना शाब्दिक चिमटे काढले होते. यापूर्वी एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनाला गेलेलं आठवत नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे घेऊन जात नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. आता गणपती दर्शनासाठी कॅमेरा घेऊन जाण्याच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना प्रतिटोला लगावला आहे.
हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर नव्हे, तर ‘या’ ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा” रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “गणपती उत्सवामध्ये फिरणं माझ्यासाठी नवीन नाही. पण काही लोकं सांगतात, मुख्यमंत्री गणपती दर्शनासाठी जातात, गाडीतून खाली उतरतात, मग कॅमेरे लावतात… पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कधीही कॅमेरे लावले नाहीत. मी जिथे जातो तिथे लोकंच फोटो काढून व्हायरल करतात.” अजित पवारांना टोला लगावताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आम्ही अशाच ठिकाणी जातो, जिथे कॅमेरे घेऊन जाता येईल.”
हेही वाचा- बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला? मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही मुख्यमंत्र्यांसारखं कॅमेरा घेऊन जात नाही. आता गाडीतून एन्ट्री करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, मग कोणतरी उतरतं. जो गणेशभक्त आहे. त्याने अशापद्धतीने देखावा दाखवण्याचं कारण नाही. भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन करत होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. त्याप्रकारची सवय त्यांना लागली आहे. आता त्याला काय करायचं? जनतेनेच बघावं आता काय चाललंय आणि काय नाही” असं अजित पवार म्हणाले होते.