राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून (२७ जून) सुरु होणार आहे. त्याआधी आज राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना या महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असल्याचा टोला लगावला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “निरोप द्यायला सभागृहात तर यायला पाहिजे ना? की फेसबुक लाईव्ह वरूनच निरोप देणार?”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“या पंचवार्षिकमधील हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की विरोधक चर्चा करतील. चहापानाला येतील. मात्र, त्यांनी एक पत्र दिलं. त्यामध्येही तेच तेच म्हटलं आहे. त्यामुळे आमची सभागृहात बोलण्याची आणि उत्तरं देण्याची तयारी आहे. पण विरोधकांची नाही. ते फक्त येतात आणि खोटं बोल पण रेटून बोल असं बोलतात. विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. ते तुमच्यासमोर छाती फुगून आले असतील आणि म्हणाले असतील की महायुतीला लोकसभेत यश मिळालं नाही, त्यामुळे सत्ताधारी पोकळ आश्वासनाची घोषणा करतील. आता नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडलं. संविधान बदलेल असं खोटं नरेटिव्ह सेट केलं. आरक्षण जाणार असं म्हटलं. यामध्ये त्यांना क्षणिक आनंद मिळाला असेल. मात्र, शेवटी मोदी पतंप्रधान झाले”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केला.

हेही वाचा : “मनुस्मृतीला महाराष्ट्रात स्थान नाही”, विरोधकांच्या पत्राला अजित पवारांचं प्रत्त्युतर; म्हणाले, “असं राजकारण करणं…”

शिंदे पुढे म्हणाले की, “विरोधकांनी एवढं करूनही काँग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या. म्हणजे तीन टर्ममध्ये ४०, ५० आता ९९. मग आता तुम्हाला २४० पर्यंत पोहण्यासाठी २५ वर्ष लागतील. एवढं सर्व करून काय झालं? शेवटी नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले. त्यामुळे मोदी जिंकले आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला. तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्यांच्या वरातीत घोड नाचवणारे आहेत. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. काय चाललंय? किती मत मिळाली?”, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर टीका केली.

“ठाकरे गटाबाबत सांगायचं झालं तर समोरासमोर आम्ही १३ जागा लढलो. त्यातील ७ जागा आम्ही जिंकलो. एकूण १९ टक्के मतांपैकी १४.५० टक्के मते धनुष्यबाणाला मिळाली. मग तुमच्याकडे किती टक्के मते राहिली. आता आलेली ही सूज आहे. ही सूज उतरेल. तुम्ही दिशाभूल करून मत मिळवलेली आहेत. हे लोकांना माहिती झालं आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुण्याचं काम केलं. आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाहीत. उद्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ. त्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल. मुंबईला विरोधकांनी खड्यांत टाकण्याचं काम केलं”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का?

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “स्वाभिमान कुठे गहाण टाकला? स्वाभिमान असता तर २०१९ ला तुम्ही गहाण टाकला नसता. लोकांच्या मनातलं सरकार आम्ही बनवलं. आज त्यांच्यापेक्षा आम्हाला लोकांनी जास्त मते दिली. विरोधकांचा स्ट्राईक रेट ४२ टक्के तर आमचा ४७ टक्के स्ट्राईक रेट आहे. हे मी छातीठोकपणे सांगतो. घरी बसलेल्यांना लोक मतदान करत नाहीत. जे मैदानात उतरून काम करतात त्यांना लोक मतदान करतात. काही लोक म्हणाले की, हे निरोपाचं अधिवेशन आहे. आता निरोप देण्यासाठी सभागृहात तर यायला पाहिजे ना? की फेसबुक लाईव्हवरूनच निरोप देणार? निरोप द्यायचा की घ्यायचा हे जनता ठरवत असते”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on criticizes uddhav thackeray and maharashtra legislative assembly monsoon session 2024 gkt
First published on: 26-06-2024 at 20:29 IST