एका कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अकस्मात धावती भेट झाल्याने अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला रामराम करणार या राजकीय चर्चेला उधाण आले. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपण काँग्रेससंदर्भात भाष्य करणार नाही असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री गेले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं.

नक्की वाचा >> गणपती दर्शनासाठी CM शिंदे नारायण राणेंच्या घरी; दर्शनानंतर भेटीदरम्याच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांच्या…”

काँग्रेसचा एक गट तुमच्यासोबत येणार आहे अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचीही चर्चा आहे. याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “खरं म्हणजे काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. सभागृहात मी बोललोय. त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच अन्य एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही जे आधी व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे असं म्हटलं.

तुमच्यासोबत आलेल्यांनी हिंमत दाखवली बाहेर पडण्याची तशी काँग्रेसमधील आमदार दाखवतील का? तुम्ही रस्ता दाखवला त्याप्रमाणे काही होईल का? अशा अर्थाचा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शिंदेंनी, “आम्ही रस्ता दाखवला नाही. जनतेच्या मनात जी भावना होती ती आम्ही जागृत केली. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आता झालं. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत,” असं म्हटलं.

“तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध करुन शिवसेनेतून बाहेर पडलात तर तेच काँग्रेसचे नेते तुमच्या जवळ येत असतील तर?” असा प्रश्न शिंदे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनीच पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. “असं कुठे होतंय का? मला तर माहिती नाही,” असं शिंदे या प्रश्नावर म्हणाले.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का; राज्यपालांना पाठवलं पत्र, राज्यपाल कोश्यारींनी ‘ती’ मागणी केली मान्य

फडणवीस- अशोक चव्हाण भेट कशी झाली?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आशीष कुलकर्णी यांनी वरळी येथील आपल्या घरी गणपती दर्शनासाठी विविध पक्षांतील नेते, जवळचे कार्यकर्ते यांना निमंत्रण दिले होते. कुलकर्णी हे २००९च्या काळात विशेषत: अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच कुलकर्णी गेली काही वर्षे भाजपमध्ये काम करत आहेत. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस हे कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते निघायच्या तयारीत असताना अशोक चव्हाण तेथे पोहोचले, तो योगायोग होता. त्या वेळी त्यांची भेट झाली. परंतु पाच मिनिटांत फडणवीस त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. या वेळी कसलीही राजकीय चर्चा झाली नाही, माध्यमांमधून चुकीच्या बातम्या प्रसारित होत असल्याचे आशीष कुलकर्णी यांनी सांगितले.

अशोक चव्हाणांशी भेट झालेली नाही- फडणवीस
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.  ‘‘मी गणपतीच्या दर्शनासाठी एका ठिकाणी गेलो होतो आणि चव्हाणदेखील तेथे पोहोचले. मात्र, त्यांची आणि माझी कुठेही भेट झालेली नाही,’’ असे फडणवीस म्हणाले.

Story img Loader