शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक सूचक विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रचंड क्षमता आहे. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं, असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. शिरसाट यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. शिंदे गट आणि भाजपात धुसपूस सुरू झाल्याचंही बोललं जात होतं. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. केंद्रात नेतृत्व करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा असेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- “शरद पवारांनी हुकूमशहा प्रवृत्तीने…”, अजित पवार गटाच्या आरोपांवर जयंत पाटलांचं उत्तर, म्हणाले…
शिरसाटांच्या वक्तव्यावर भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्याबरोबर असणं आवश्यक आहेत. एक टीम म्हणून आम्ही तिघेही बरोबर असणं गरजेचं आहे. तसेच पुढे विधानसभा निवडणूक आहे. ती निवडणूकदेखील आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत. ही निवडणूक जिंकणं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. दिल्लीत खूप मोठे-मोठे नेते आहेत. शेवटी केंद्रात नेतृत्व करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक निर्णय असणार आहे. हा निर्णय राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे.”
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
संजय शिरसाट म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाबाबत काही लोक बॅनर लावतात. परंतु, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीसांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असे बॅनर लावण्यात काही गैर नाही. परंतु, माझी इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करत आहेत, त्यांची इतकी क्षमता आहे की त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं.