शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज परळी दौऱ्यावर आहेत. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात भाजपाच्या नेत्या आणि गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या कार्यक्रमात अलिप्त राहणाऱ्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे आज बऱ्याच दिवसांनी एकाच व्यासपीठावर आल्याने परळीतील कार्यक्रमात अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. तसंच, त्यांचे बंधू धनजंय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंचे राजकीय मतभेद आहेत. असं असतानाही या कार्यक्रमात पंकजा मुंडे आज हजर राहिल्या. या कार्यक्रमाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आतापर्यंत २० कार्यक्रम झाले. त्यापैकी हा कार्यक्रम सर्वांत मोठा आणि रेकॉर्डब्रेक कार्यक्रम आहे. इथं येताना आम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथचं दर्शन घेतलं. आमचे मित्र, लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्याही समाधीचं दर्शन घेतलं.
हेही वाचा >> “आज पारा जरा जास्तच वाढलाय, कारण मी आणि धनंजय..”, पंकजा मुंडेंची मिश्किल टिप्पणी; उपस्थितांमध्ये एकच हशा!
“धनंजय मुंडे यांनी फार मोठी मिरवणुकीची तयारी केली होती. परंतु, पुणे – मुंबईत महत्त्वाचे कार्यक्रम असल्याने आम्ही मुंडेंना विनंती केली. आम्ही येताना आमच्या तिघांबरोबर पंकजा ताईंनाही विमानातून घेऊन आलो. हेलिकॉप्टरमध्ये धनंजयलाही एकत्र घेतलं आणि एकत्र घेऊन व्यासपीठावर आलो आहे. धनंजयने सांगितलं आहे की बीडचा विकास आपण सगळे एकत्र येऊन करू”, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बीडकरांना दिली.
पंकजा मुंडेंची कोपरखळी
दरम्यान, महायुतीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनीही मिश्किल टिप्पणी केली. “मी जेव्हा आज मंचाकडे बघत होते, तेव्हा मला फार गरम होत होतं. मला वाटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यात एवढं गरम का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस हे तिघंही परळीच्या या एका मंचावर आले आहेत. पण त्याहीपेक्षा इथे थोडा पारा जास्तच वाढलाय. कारण धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही एकाच मंचावर आलेले आहेत”, अशी कोपरखळी यावेळी पंकजा मुंडेंनी मारली.