Eknath Shinde On Heena Gavit : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. या प्रचाराच्या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असं असलं तरी या निवडणुकीत युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे काही इच्छुकांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. त्यामुळे काही नेते बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं.
माजी खासदार हिना गावित यांनीही बंडखोरी करत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्या अक्कलकुवा मतदारसंघामधून अपक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. आता महायुतीत अक्कलकुवा मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे) वाट्याला गेला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी या मतदारसंघातून आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिलेली आहे. मात्र, यामुळे नाराज होऊन हिना गावित या अपक्ष निवडणुकीत उतरल्या आहेत. दरम्यान, सध्या प्रचारसभा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे यांची आमश्या पाडवी यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी हिना गावित यांना इशारा दिला आहे. “महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि बंडखोरी करायची, पण आता हे चालणार नाही”, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“आपल्याला या निवडणुकीत आदिवासींबरोबर भाकरी खाणारा आमदार निवडून द्यायचा आहे. आमशा पाडवी हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत आणि जमिनीवरचे कार्यकर्तेच तुमच्या कामाला येतील. जर त्यांनी काम केलं नाही तर मी त्यांचा कान पकडून काम करून घेईन. मात्र, महायुतीमध्ये मंत्रिपदाचा हलवा खायचा, मंत्रिपदामधून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची, हे आता चालणार नाही. जे बंडखोरी करतात, त्यांना देखील हद्दपार करण्याचं काम तुमच्या हातात आलं आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिना गावीत यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, माजी खासदार हिना गावित यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत पक्ष सदस्यत्वाचा व पक्षातील सर्व पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला. हिना गावित या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या देखील होत्या. आता त्या अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे के.सी पाडवी आणि महायुतीकडून आमशा पाडवी हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.