CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. असे असानाच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली आहे. मात्र, या योजनेवर विरोधक टीका करत आहेत. अशातच या योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या योजनेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “माझ्या लाडक्या बहिणी कपटी आणि सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधकांनी टीका केली की, लाडक्या भावांचं काय? मग आम्ही लाडका भाऊ योजनाही आणली. मात्र, ही योजना बंद पडावी आणि लाडक्या बहि‍णींना पैसे मिळू नये, म्हणून हे कपटी सावत्र भाऊ हे न्यायालयात पाठवत आहेत. न्यायालयात आमच्या लाडक्या बहि‍णींना न्याय मिळेल. लाडक्या बहिणी या कपटी आणि सावत्र भावांना धडा शिकवतील. लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून विरोधकांनी न्यायालयात माणसं पाठवली आहेत. मात्र, न्यायालय आमच्या लाडक्या बहि‍णींना न्याय देईल”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.

हेही वाचा : लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी ओबीसींबाबत भूमिका स्पष्ट करावी …अन्यथा समाज पराभूत करणार – लक्ष्मण हाके

“आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही मिळून या योजनेची तरतुद केली आहे. पण निवडणुकीचा जुमला हे महाविकास आघाडी करत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने योजना जाहीर केल्या. पण नंतर ते म्हणाले की पैसे नाहीत. त्यामुळे हा विरोधकांचा जुमला आहे. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली भाषा ही सुडाची भाषा आहे. अशा प्रकारे सूड घेण्याची भाषा आतापर्यंत कोणीही केली नव्हती. मात्र, जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या पाठिमागे मी खंबीरपणे उभा आहे. आव्हान देणाऱ्यांच्या मनगटात ताकद लागते. दिल्लीला आव्हान देण्याची भाषा गल्लीत बसून करता येत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अडकवण्याचे जे आरोप ते करत आहेत, ते आरोप खोटे आहेत. हा एक निवडणुकीचा खोटा नरेटीव्ह पसरवण्याचं काम ते करत आहेत. पण जनता विरोधकांना घरी बसवेल”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on ladki bahin yojana mahavikas aghadi uddhav thackeray sharad pawar gkt