CM Eknath Shinde : पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाच्या उद्घाटनासह विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण आज (२९ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पार पडले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने आंदोलन करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर विविध विषयांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं. खरं तर हा उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी होणार होता. मात्र, आपण पुढे ढकलला. पण कितीही संकटे आली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी न डगमगता विकास कामांना कधीही ब्रेक देत नाहीत. ते संवेदनशील मनाचे आहेत. आपण आधी उद्घाटनाच्या कार्यक्रमाची मोठी तयारी केली होती. पण पाऊस पडत असल्यामुळे पुणेकरांना त्रास होऊ नये, या गोष्टी पंतप्रधान मोदी यांनी विचारात घेतला होता. त्यामुळे संवेदनशील पंतप्रधान कसे असतात, हे त्यांनी दाखवून दिलं”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : अक्षय शिंदेचा एन्काउंटर की हत्या? कथित प्रत्यक्षदर्शीच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे सरकारची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मेट्रोच्या या मार्गाचे उद्घाटन काही दिवसांनी पुढे ढकललं तर लगेच विरोधक म्हणालायला लागले की आम्ही या भूमिगत मार्गाचे उद्घाटन करतो. खरं तर उद्घाटन केलं असतं तरी विरोधकांनी म्हटलं असतं की लोकांना त्रास झाला, उद्घाटन नाही केलं तर म्हणतात विलंब झाला, म्हणजे विरोधक दोन्हीकडून देखील बोलतात अशी परिस्थिती आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला.

दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. म्हणाले, “बदलापूर प्रकरण घडल्यानंतर आरोपीला फाशी द्या, असं विरोधक म्हणत होते. त्यानंतर आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी बंदूक फक्त प्रदर्शनासाठी ठेवायची का? पोलिसांनी समजा ते केलं नसतं तर विरोधकच म्हणाले असते की चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला. मग पोलिसांची बंदूक काय प्रदर्शनासाठी ठेवली का? म्हणजे विरोधक इकडून पण बोलतात आणि तिकडूनही बोलतात”, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.