Eknath Shinde On Mahavikas Aghadi : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण तापलं आहे. महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेची मोठी चर्चा आहे. मात्र, या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरच आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत इशारा दिला. “मी एकच सांगतो की एकवेळी आमच्यावरील टीका केली तर आम्ही सहन करू. मात्र, आमच्या बहिणींच्या हिताच्या आडवं कोणी आलं तर मग गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा”, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मी मंत्रिमंडळात सांगितलं होतं की, रक्षाबंधनाच्या अगोदर या योजनेचे पैसे पोहोचले पाहिजेत. मात्र, हे पैसे पोहोचले की नाही ते पाहण्यासाठी काही लोक म्हणाले की, आधी एक रुपया टाकूयात. त्यांना मी म्हटलं जर एक रुपया टाकला तर विरोधक म्हणतील ३ हजार देणार म्हणाले आणि १ रुपया टाकला. त्यानंतर आम्ही ठरवलं की सर्व तीनच्या तीन हजार रुपये टाकायचे आणि योजना सुरु करायची. तेव्हापासून मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जात आहे, त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहीणी मला पैसे खात्यात जमा झाल्याचं सांगतात”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
“जनतेच्या जीवनात सुखाचे दिवस आले पाहिजेत, हाच आमचा प्रयत्न आहे. तुम्ही संसार चालवताना जशी कसरत करता तसंच आम्हाला सरकार चालवताना देखील कसरत करावी लागते. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासाची काम सुरु आहेत. हे काम करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींनाही काही द्यायचं असतं. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली. ही योजना जाहीर झाल्यानंतर विरोधक म्हणाले, लाडक्या बहिणींसाठी योजना आणली. मग लाडक्या भावांचं काय? त्यानंतर आम्ही लाडक्या भावांसाठीही आम्ही योजना आणली”, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
माझ्या बहिणींच्या हिताच्या आडवं आलात तर…
“आपल्या सर्वांना माहिती आहे की मी कार्यकर्त्यांमधून आणि सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलो आहे. मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांना पुरुन उरलो आहोत. एवढंच नाही तर सावत्र आणि कपटी भावांवर मात करुन इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करु नका, त्यांना फक्त लक्षात ठेवा आणि योग्यवेळी त्यांना योग्य जागा दाखवा. सावत्र भाऊ खोटे आरोप करत आहेत, ही योजना फसवी आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे. मग त्यांच्यातील कोणी म्हणत की, ही काय लाच देता का? असं काहीही बोलायला लागले आहेत. मात्र, आमच्या बहिणींबाबत असं बोलायला त्यांना थोडंतरी काही वाटायला पाहिजे. या योजनेत खोडा घालण्याचं काम विरोधकांनी केलं. त्यांना योग्यवेळी जोडा नक्की दाखवा. या लोकांना १५०० रुपयांचं मोल काय समजणार? शेवटी मी एकच सांगतो की, एकवेळी आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू. पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर मग गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा”, असं इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.