CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत, तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा या योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरच आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमधून दिल्या जाणाऱ्या निधीबाबत मोठं विधान केलं. “सर्वांनी आशीर्वाद आणि बळ दिलं तर १५०० रुपयांचे ३००० होतील”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“ज्यांनी-ज्यांनी कोवीडच्या काळातही सोडलं नाही. पुण्यात देखील काही कोवीड सेंटर्स उभे केले आणि खोटे रुग्ण दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले. एवढंच नाही तर रुग्णांच्या तोंडची खिचडीही पळवली. त्यांना तुमच्या तोंडचा घास पळवायचा होता. आताही तुमच्या तोंडचा घास हिरवण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. पण मी तुम्हाला सांगतो की, आनंदाचा शिधा आपण दिवाळी दसरा आणि गणपतीमध्ये देतो. त्यामध्ये रवा, मैदा, साखर, तेल, डाळ असं सर्व असतं. त्याही विरोधात ते न्यायालयात गेले होते. विरोधक हे पाप कुठे फेडणार आहेत? मात्र, आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केला.

हेही वाचा : Eknath Shinde : “…तर गाठ माझ्याशी आहे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

“अजित पवार यांनी देखील आपल्याला सांगितलं, आता मी देखील सांगतो की, आम्ही तुम्हाला १५०० रुपये महिन्याला देत आहोत, म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये. ही लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. उद्या आपल्या सरकारची ताकद आणखी वाढली आणि तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला तर या दीड हजारांचे पावणे दोन हजार होतील, पावणे दोन हजारांचे दोन हजार होतील, तुम्ही बळ दिलं तर दोन हजारांचे अडीच हजार होतील आणि अडीच हजारांचे तीन हजार होतील”, असं मोठं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

माझ्या बहि‍णींच्या हिताच्या आडवं आलात तर…

“आपल्या सर्वांना माहिती आहे की मी कार्यकर्त्यांमधून आणि सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलो आहे. मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांना पुरुन उरलो आहोत. एवढंच नाही तर सावत्र आणि कपटी भावांवर मात करुन इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करु नका, त्यांना फक्त लक्षात ठेवा आणि योग्यवेळी त्यांना योग्य जागा दाखवा. सावत्र भाऊ खोटे आरोप करत आहेत, ही योजना फसवी आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे. मग त्यांच्यातील कोणी म्हणत की, ही काय लाच देता का? असं काहीही बोलायला लागले आहेत. मात्र, आमच्या बहि‍णींबाबत असं बोलायला त्यांना थोडंतरी काही वाटायला पाहिजे. या योजनेत खोडा घालण्याचं काम विरोधकांनी केलं. त्यांना योग्यवेळी जोडा नक्की दाखवा. शेवटी मी एकच सांगतो की, एकवेळी आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू. पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर मग गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा”, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.

Story img Loader