CM Eknath Shinde : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गावी जाताना हेलिकॉप्टर दौऱ्यावरून टीका केली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तरही दिलं होतं. यावरूनच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. याचवेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “आठ तासांत मी १० हजार फाईलींवर सह्या करतो”, असं मुख्यमंत्री शिंदेंनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“महायुती सरकारने एका रुपयामध्ये पीक विमा योजना सुरु केली आहे. शेतकऱ्याने एक रुपया द्यायचा बाकीचे पैसे सरकार भरणार, आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कापसालाही पैसे देण्याचे काम सुरु केले आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल देखील माफ करण्याचं काम आपण केलं. कल्याणकारी योजना देण्याचं काम सरकार करत आहे. आम्ही देखील गरीबी पाहिली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले, त्याचा आम्ही काहीतरी व्यवसाय सुरु केला असं अनेक बहिणी सांगत आहेत. अनेक बहिणी त्यांच्या घरात काही खरेदी करतात. याचा अर्थ हे पैसे चलनात येतात आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा देखील होईल”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : Jitendra Awhad : “भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे”, ‘शिवनेरी सुंदरी’च्या निर्णयावरून जितेंद्र आव्हाडांची टीका

“आम्ही आता ठरवलं आहे की लाडक्या बहि‍णींना लखपती केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच लाडक्या भावांसाठी देखील रोजगार देण्यासाठी योजना आणली आहे. तसेच मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजना देखील सुरु केली आहे. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्यामुळे आपण शासन आपल्या दारी योजना सुरु केली. त्याचा पाच कोटी लोकांना लाभ मिळाला. याआधीही लाभार्थी होते, योजनेचा लाभ मिळत होता. पण लोक याचा लाभ घेता घेता कंटाळून जात होते. सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हणून सोडून द्यायचे. त्यामुळे आता आम्ही शासन लोकांच्या घरी नेण्याचे काम केलं”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका

“शेती करायला गावाकडे गेलं की आमच्यावर काहीजण टीका करतात. विरोधक मला म्हणतात की हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. मग आता गावी शेती करायला गाडीने जाऊ का? मग १० तास लागतील किंवा ८ तास लागतील. आठ तासांमध्ये मी १० हजार फाईलींवर सह्या करतो. एवढा वेळ माझ्याकडे नाही, तुमच्याकडे होता. कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाहीत. मात्र, मी मातीतला आणि जमिनीवरला माणूस आहे. त्यामुळे गावी गेलं की माझे पाय आपोआप शेताकडे ओळतात”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on majhi ladki bahin yojana uddhav thackeray mahavikas aghadi maharashtra politics gkt