बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मराठा आरक्षणाच्याबाबत मोठी घोषणा केली आहे. “२० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत “संयम बाळगावा,” असं आवाहन जरांगे-पाटलांना केलं आहे.
‘एबीपी माझा’शी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्विकारली आहे. याप्रकरणी २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे.”
हेही वाचा : “आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो, खूप दिवस झालं तुझी…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचा भुजबळांना इशारा
“राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे”
“मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकिलांची फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्वाचं आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये. सर्वोच्च न्यायालयात आपण सर्व बाबी मांडू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा : “२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण”, बीडमधून जरांगे-पाटलांची मोठी घोषणा
“क्युरेटिव्ह पिटीशनवर २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी”
“आंदोलनकर्ते, विरोधी पक्ष आणि सरकारचं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एकमत आहे. आता क्युरेटिव्ह याचिकेवर २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कुणीही घाईगडबडीनं निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जरांगे-पाटलांना केलं आहे.