राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बोलावली होती. मात्र, या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. आरक्षणाच्या मुद्यांवर विधानसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. पण ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “राज्यात जातीय तेढ रहावा अशी भूमिका महाविकास आघाडीची असून दोन समाजात तेढ निर्माण व्हावा, आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी, हा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र, विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

हेही वाचा : “आपली राजकीय जात कुठली? हे दाखवण्याचा…”, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जे काही वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्र असाच पेटता राहावा, अशा प्रकारचं धोरण महाविकास आघाडीचं आहे. हे आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने टाकलेल्या बहिष्कारामधून दिसून आलं आहे. राज्यात कधी अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर सरकार आणि विरोधी पक्ष तसेच सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करून मार्ग काढत असतात. दोन्हीही समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यावरच आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, या दोन्ही समाजात संघर्ष कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी, ही महाविकास आघाडीची भूमिका महाराष्ट्रासमोर आली आहे”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “आंदोलकर्त्यांनीही या बाबींचा निश्चित विचार केला पाहिजे. मराठा आणि ओबीसींबाबत विरोधकांना किती प्रेम आहे? याचा विचार केला पाहिजे. आम्ही मराठा समाजाला न्याय दिला. १० टक्के आरक्षण दिलं पण ते आरक्षण रद्द व्हावं, यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. विरोधक हे आता दुटप्पी भूमिका घेत आहेत. याचा विचार मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाने करावा. आम्ही ज्या दिवसांपासून १० टक्के आरक्षण दिलं तेव्हापासून हे आरक्षण टिकणार नाही, अशा प्रकारचा टाहो विरोधक फोडत होते”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on maratha and obc reservation mahavikas aghadi and politics gkt