Eknath Shinde : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. या प्रचाराच्या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. मात्र, असं असतानाच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं होतं.

‘निवडणुकीच्या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगता येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे’, असं नवाब मलिक यांनी’मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. दरम्यान, मलिकांच्या या विधानानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य करत शरद पवारांनी त्यांची का भेट घेतली होती? यासंदर्भात सांगत ‘मला दुसरा विचार करण्याची गरज काय? आम्हाला दुसरा कोणताही विचार करण्याची आवश्यकता नाही’, असं म्हणत चर्चांवर पडदा टाकला आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : “मी शरद पवारांना सोडलेलं नाही”, ऐन निवडणुकीत अजित पवारांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याचं कारणही सांगितलं

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) अशी आमची महायुती आहे. ही महायुती मजबुतीने उभा असून इतर कोणाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. जर ते (नवाब मलिक) म्हणत असतील तर त्यांना माहिती असेल. त्यांना विचारलं पाहिजे. पण माझ्याकडून तर काहीही सुरु नाही. मी महायुती म्हणून काम करत आहे. विकासाचा अजेंडा म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. मला खात्री आहे की, या निवडणुकीत महायुती संपूर्ण बहुमताने जिंकेल. मला दुसरा विचार करण्याची गरज काय? आमची विचारधारा आणि भाजपाची विचारधारा एक आहे. त्यामुळे आम्हाला दुसरा कोणताही विचार करण्याची आवश्यकता नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी दोन वेळा भेट घेतल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, “काही लोक लपून-छपून भेटतात. पण आम्ही तसं करत नाहीत. ते स्वत: आले होते, सह्याद्रीवरही आले होते. कारण मी मुख्यमंत्री असल्यामुळे सर्व पक्षांचे लोक मला भेटतात. मग त्यामध्ये काँग्रेसचेही लोक भेटतात. राज ठाकरेही भेटतात, शरद पवार भेटण्यासाठी आले तेव्हा काही राज्याचे विषय होते. त्यामध्ये राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता काय?”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

“मला बाळासाहेबांची शिकवण आहे. आज ज्या पद्धतीची टीका सुरु आहे. सध्या राजकारण किती खालच्या थराला गेलं आहे, ठाकरे गटाकडून हे तुम्हाला दररोज पाहायला मिळतं. आमच्यावर तसे संस्कार आहेत. आम्ही कामाला प्राथमिकता देतो. पण ते (उद्धव ठाकरे) काय आरोप करतात? त्यांची दोन चार वाक्य ठरलेली आहेत. मग तुम्ही काय केलं ते सांगा? अडीच वर्षात सर्व बंद पाडलं, आता पुन्हा ते म्हणत आहेत की हे बंद पाडणार, ते बंद पाडणार. मग तुम्ही सुरु काय करणार? ते सांगा”, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले होते?

नवाब मलिक यांनी एका मुलाखतीत अनेक दावे केले होते. निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असे ते म्हणाले होते.