पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जचे काही प्रकरण समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील बार आणि पब लोकांच्या रोषाचा विषय ठरले आहेत. पुणे शहरातील ड्रग्जच्या प्रकरणावरून आता राज्य सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत राज्यातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. “राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही. जोपर्यंत ड्रग्ज मुक्त शहरं होत नाहीत, तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरु राहणार”, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ड्रग्ज विकणाऱ्यांवर, ड्रग्ज ठेवणाऱ्यांवर तसेच ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते आणि या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करण्याचं काम जे लोक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. फक्त पुणे शहरच नाही तर पुणे, ठाणे, नाशिक आणि संपूर्ण राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल त्यांना सोडलं जाणार नाही. ड्रग्जची पाळंमुळं उखडून फेकण्याचं काम पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त करत आहेत. ड्रग्जचे जे सप्लायर असतील आणि कोणी कितीही मोठं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. तरुण पिढी बरबाद होऊ देणार नाही. जोपर्यंत पूर्णपणे ड्रग्ज मुक्त शहरं होत नाहीत तोपर्यंत ही बुलडोझर कारवाई चालू राहिल. जे कोणी ड्रग्ज विकत असतील त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
हेही वाचा : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत; संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “एखादी व्यक्ती…”!
विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्यांवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून खड्यांमध्ये अनेक वर्ष भ्रष्ट्राचार झाला आहे. रस्त्यावरील खड्यांमधून ज्यांनी काळा पैसा पांढरा केला. त्यांच्यावरही बुलडोझर कारावाई केली जाईल”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
इंद्रायणी नदीची पाहणी करणार
आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदीची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनात आले. नदीमध्ये रसायनयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी स्वत: वारीसाठी जाणार आहे. त्यावेळी मी नदीची पाहणी करणार आहे. त्यावेळी संबधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याची भूमिका सरकारची आहे.”