CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यभरात सध्या ठिकठिकाणी सभा आणि मेळावे सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी अशा राज्यभरात सभा सुरु आहेत. त्याचबरोबर विविध मतदारसंघात निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. पक्ष संघटनेचा आढावा नेत्यांकडून घेतला जात आहे. यातच काही पदाधिकारी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही दिसून येत आहे. या अनुषंगाने आज शिवसेना (शिंदे) युवासेनेचे नेते तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला (शिंदे) धक्का बसला.
दरम्यान, दिपेश म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंचा कार्ट असा उल्लेख केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. “मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा”, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता दिलं.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“मला त्यांच्यावर (उद्धव ठाकरे यांच्यावर) आरोपाला आरोप आणि उत्तर द्यायचं नाही. मी कामामधून उत्तर देतो. त्यामुळे ते बिथरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना धडकी भरली अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्यामुळे मी सांगतो बापाशी भिडा ना मुलाशी काय भिडताय”, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“आता त्या ठिकाणी जे खासदार आहेत. मुख्यमंत्र्यांचं कार्ट. लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघांत पैसा ओतला. सत्तेचा गैरवापर करण्यात आला. एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी यावं लागलं. मात्र, तरी देखील कल्याण-डोंबिवलीकरांनी जवळपास ४ लाख मते आपल्या भगव्याला दिले आहेत. आता तुमची सर्वांची ताकद विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून द्या”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.