एकीकडे दिल्लीत पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातही अधिवेशनाच्या निमित्ताने आजपासून सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर आले आहेत. विधिमंडळात आज पहिल्याच दिवशी हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिसून आले. उद्धव ठाकरेंनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारला लक्ष्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. “घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो हे मी कायमच म्हणत असतो. या सरकारमध्ये हिंमत असेल तर गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे. एवढंच नाही तर त्यासंबंधीची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. ही श्वेतपत्रिका जर या सरकारने काढली तर तो एक कोरा कागद असेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“या सरकारला खोके सरकार, महायुती सरकार म्हणतात. पण केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार म्हणजे महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती झाली आहे. पेपरही फुटत आहेत. तरीही यांना लाज, लज्जा, शरम वाटत नाही. आम्ही प्रश्न मांडले की आमच्यावर आरोप होत आहेत. आमच्याकडून काही प्रश्न उपस्थित केले जातीलच”, असंही उद्धव ठाकरे पत्रकार परिषदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर!

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी या टीकेवरून उद्धव ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला लीकेज सरकार म्हणतात, पण ते अडीच वर्ष सिक (आजारी) होते, तर मग सिकेज होते का? निरोप कोण कुणाला देईल, हे येणारा काळ ठरवेल. हे सगळं जनतेच्या हातात असतं. दोन वर्षं आमच्या सरकारनं केलेल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याचा आमचा निश्चय आहे”, असा निर्धार एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

“पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी”

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेती दौऱ्यांवर टोला लगावला होता. ‘मुख्यमंत्री अमावस्या-पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात’, अशा आशयाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. “राज्यातले शेतकरी ही परिस्थिती भोगत आहेत. सरासरी रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतो आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना या खोके सरकारने लवकरात लवकर कर्जमुक्त केलं पाहिजे”, असं म्हणत टीकास्रही सोडलं होतं.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरही एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. “लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी की नाही? शेतकऱ्यानं चांगली पंचतारांकित शेती करू नये का? नगदी पिकं घेऊ नये का? त्यांच्या डोक्यात अमावस्या-पौर्णिमा चालतात. लिंबू-मिरच्यावाले विचार असतात. मी त्यांना माझ्या शेतातली सगळी फळं पाठवीन”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंची टीका, “महाराष्ट्रात महागळती आणि लीकेज सरकार, यांना लाज, लज्जा, शरम…”

“तुमचे भाऊ कुठे आहेत?”

दरम्यान, “लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना यांनी आणावी. योजनेत भेदभाव करू नये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर एकनाथ शिंदेंनी खोचक प्रतिप्रश्न केला आहे. “आम्ही लेक लाडाची केलंच. लाडकी बहीण-लाडका भाऊही करू. पण हे बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? त्यांनी तरी विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. का सगळे भाऊ गेले? आम्ही सगळ्या भावांचा-बहि‍णींचा विचार करणार. तुम्हाला कळेलच”, असं सूचक विधान एकनाथ शिंदेंनी केलं आहे.