राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर, या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“महिलेने गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस चौकशी करुन तपास आणि पडताळणी करतील. गुन्ह्यात तथ्य असेल, नसेल हे पाहून पोलीस पुढील कारवाई करतील. राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : “माझ्या खुनाचा कट रचला असता, तरी चाललं असतं पण…”, विनयभंगाच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटला
“गर्दीतून पुढे जात असताना एखाद्याला बाजूला करणे, हा…”
जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “काल ठाण्यात झालेल्या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात कुठेही विनयभंग झाल्याचे दिसत नाही. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसले असताना तिथून १० फुटाच्या आत ही घटना घडली आहे. गर्दीतून पुढे जात असताना एखाद्याला बाजूला करणे, हा कोणता विनयभंग आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती.”
“आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबला जात असेल तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं नाही,” असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.