महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी जोमाने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा मिळवता आल्या. तर ३० जागा मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास भलताच दुणावला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना महायुतीचा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकही फुंकून प्यायचं आहे असं म्हणत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“विधानभवनात आपण विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्रात काय घडेल, कधी कोण सरकार स्थापन करेल हे सांगता येत नाही. कारण २०१९ मध्ये महायुतीला कौल मिळाला होता. पण महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण मी सांगू इच्छितो की महाविकास आघाडीलाही वाटलं नव्हतं की आपलं सरकार जाईल आणि महायुतीचं येईल. त्यामुळे मी एक शेर ऐकवतो, ‘मै अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोक साथ आते गये और कारवाँ बनता गया.’ आपला कारवाँ आता मोठा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने मोठा उठाव पाहिला. नागरिकांच्या आणि मतदारांच्या विश्वासघाताच्याविरोधातला तो उठाव होता.आम्ही धाडसी निर्णय घेऊन महायुतीचं सरकार आणलं. हे सरकार लोकांच्या भूमिकेतलं आहे, बाळासाहेबांच्या विचारांचं आहे. ५० आमदार बरोबर होते, त्यानंतर १३ खासदार आले. लाखो कार्यकर्ते आले. देवेंद्र फडणवीस यांची मला साथ लाभली.” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महायुतीचं सरकार आल्याने महाराष्ट्राचं चित्र पालटलं

अजित पवार बरोबर आल्याने ताकद वाढली आहे. महायुतीने महाराष्ट्राचं चित्र पालटलं आहे. अडीच वर्षात त्यांनी स्टे देऊन सगळ्या गोष्टींना स्पीडब्रेकर टाकून ठेवले होते. सगळं बंद होतं आणि फेसबुक सुरु होतं. तसंच वर्क फ्रॉम होम चाललं होतं. मात्र आपलं सरकार आल्यावर आनंदाचं वातावरण निर्माण झालं. दहीहंडी उत्सवाने सुरुवात केली आणि आपलं सरकार आल्यावर सगळे सण उत्सवही जोरात, जोशात आणि जल्लोषात साजरे होऊ लागले. राज्यात समृद्धी, आनंदाचं वातावरण तयार झालं. कारण महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा बंद होता कामा नये. राज्याचं वर्तमान आपण सुधारलं आहे आणि भविष्य सुधारण्याचा ध्यास घेतला आहे. इथे उपस्थित असलेले सगळेजण आपली ताकद आहे.

आपली एकजूट आता महत्त्वाची आहे

आता आपली एकजूट महत्त्वाची आहे. लोकांना माहीत आहे, की आपलं सरकार काम करणारं सरकार आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस रात्री उशिरापर्यंत काम करतो. अजित पवार हे सकाळी लवकर उठून काम करतात. हे सरकार २४ तास काम करणारं आहे. लोकांनीही हे मान्य केलं आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे. आम्ही वैयक्तिक लाभाचा मागच्या दोन वर्षांमधल्या एकाही कॅबिनेटमध्ये घेतलेला नाही. राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. पण सामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं कसं होईल या दृष्टीने आम्ही काम करतो आहोत. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे पण वाचा- तडजोड केली, तरच युती टिकते; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे महायुतीच्या मेळाव्यात परखड मतप्रदर्शन

आता आपल्याला ताकही फुंकून प्यायचं आहे

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये डबल इंजिन सरकार असताना महायुतीला मोठा फटका बसला. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महायुतीच्या मेळाव्यात अर्थातच या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी मोलाचा सल्ला दिला. तर त्यांचे कानही टोचले. एकदा मार पडला आहे. आता गाफील राहू नका. आता ताकही फुंकून प्यायचं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde once beaten do not be heedless chief minister eknath shinde advice to party workers scj
Show comments