Eknath Shinde : महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात या योजनेसंदर्भातील कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. मात्र, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांना धमकी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधकांच्या या आरोपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
“विरोधकांचा हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मुळात त्यांनी सुरुवातीपासूनच या योजनेला विरोध केला आहे. आधी ही योजना बोगस आहे, महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, जेव्हा पैसे यायला लागले, तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. विरोधक म्हणजे कपटी सावत्र भावासारखे आहेत. महिलांच्या खात्यात पैसे जाऊ नये, हा एकच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे”, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
हेही वाचा – Supriya Sule : सुप्रिया सुळेंची राखी पौर्णिमेच्या आधी टीका, “१५०० रुपयांत महिलांची मतं विकत घेण्यासाठी..”
“महिलांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली”
“या योजनेसाठी अर्ज भरू नका, तुमच्या खात्यात पैसे येणार नाही, असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. पण महिलांनी त्यांच्याकडे लक्ष न देता सरकारवर विश्वास ठेवला. या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज करत विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
“पात्र ठरलेल्या प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ मिळेल”
“आज साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या. त्यापैकी बहुतेक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत. ज्यांचे आधार कार्ड बॅंकेला जोडलेले नाहीत, त्यांनाही लवकर पैसे मिळतील. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरणाऱ्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे पैसे मिळतील. सरकारने त्यासाठी लागण्याऱ्या निधीची तरतूद केली आहे”, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा – CM Eknath Shinde : “…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
विरोधकांनी नेमका काय आरोप केला होता?
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर महिलांना धमकी दिल्याचा आरोप होता. “लाडकी बहीण योजना ही फसवी आहे. आत्ता जे पैसे दिले जात आहेत, त्याबरोबर धमकीही दिली जात आहे. धमकी हा बोनस आहे. लाडक्या बहिणींना कार्यक्रमाला बोलवायचं आणि आल्या नाहीत तर धमक्या द्यायच्या, असं चाललं आहे” असं संजय राऊत म्हणाले होते. तर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत, बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार, अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.