राज्यातील करोना संकटाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णांची अहोरात्र सेवा केली. या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोना काळात वैद्यकीय सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत लाभ मिळावा यासाठी गुणांकन कार्यपद्धती तयार करा, असे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांच्या करोना काळात राज्यात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील भरतीच्यावेळी कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामांची नोंद घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे.
करोना साथीच्या काळात महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवेवर प्रचंड ताण पडला होता. सर्वसामान्यांसह आरोग्य अधिकारी, डॉक्टर्सदेखील करोनाच्या विळख्यात सापडले होते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता जाणवू लागली होती. या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात देत करोनाशी सामना केला. करोनाच्या कठिण काळातील त्यांच्या योगदानाचा नोकरीत लाभ व्हावा, यासाठी सरकारने गुणांकन पद्धती ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.