महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याची बातमी आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. खरंतर राहुल कनाल यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. राहुल कनाल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबरचे फोटो हे टाइम्स स्क्वेअरवर झळकवले. टाईम्स स्क्वेअरवरील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक सुरू असताना युथ काँग्रेसचे पदाधिकारी प्रतीक पाटील यांनी टाईम्स स्क्वेअरवर फोटो झळकवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कांचं रेट कार्ड जाहीर करून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रतीक पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम स्क्वेअर येथे झळकला. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत, अशा आशयाची बातमी तुम्हाला आज वृत्तवाहिन्यांवर दिसेल. टाईम स्क्वेअर येथील डिजिटल जाहिरात फलक (बिल बोर्ड) येथे झळकण्याचा दर पुढील प्रमाणे. एक फोटो – १५ सेकंद – १५० डॉलर्स. तसेच एक बोर्ड संपूर्ण दिवसभर झळकवण्यासाठी सुमारे ७ हजार डॉलर्स मोजावे लागतात. बोला तुमचा फोटो झळकवायचा आहे का?
दरम्यान, प्रतीक पाटील यांनी दिलेली माहिती आम्ही तपासून पाहिली. त्यानुसार टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डचं अधिकृत संकेतस्थळ आहे. तसेच त्यांचा अधिकृत फोन नंबरही आहे. टाइम्स स्क्वेअरवर फोटो अथवा व्हिडीओ झळकवण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तसेच यावर फोटो अथवा व्हिडीओ झळकवण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील याबाबतची तपशीलवार माहितीदेखील संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…
टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डच्या या संकेतस्थळावरील माहितीनुसार या बिलबोर्डवर एक फोटो १५ सेकंदांसाठी दाखवायचा असेल तर तुम्हाला १५० डॉलर्स (१२,४०२ रुपये) मोजावे लागतील. दिवसभरात प्रत्येक तासाला तुमचा फोटो येथे झळकवला जाईल. दिवसभरात २२ वेळा प्रत्येकी १५ सेकंद हा फोटो टाईम्स स्क्वेअवर दिसेल. तसेच तुम्हाला तुमचा फोटो किंवा व्हिडीओ ६० सेकंद झळकवायचा असेल तर ५०० डॉलर्स मोजावे लागतील. या पॅकेजमध्ये तुमचा फोटो किंवा व्हिडीओ दिवसातून २२ वेळा दाखवला जाईल.