लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना मोठा फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महायुतीतील पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला मुख्यंमत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या पराभवाचे विश्लेषण करत असताना मतदार सुट्टीवर गेल्याचे कारण दिले. “आपण ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्यामुळे आपले हक्काचे मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टीवर गेले”, असे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, “आपले मतदार मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले. पंतप्रधान मोदी ४०० पार जागा आणणारच आहेत, असा विचार करून मतदार सुट्टीवर गेले. आपण गाफील राहिलो आणि विरोधकांचे ८० टक्के मतदार ठपाठप मतदान करून गेले. यातून शिकण्यासारखे आहे. आपल्या ८० टक्के नाही तर ६० टक्के मतदारांनीही जर मतदान केले असते तर आपल्या ४० जागा निवडून आल्या असत्या.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान, “आता आपल्याला ताकही फुंकून प्यायचं आहे”

विरोधकांच्या प्रचारावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांनी खोटा प्रचार केला होता. पण लोक एकदाच फसतात, वारंवार फसत नाहीत. आता आम्ही शहाणे झालो आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला दुजोरा दिला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते कमी पडले, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक मतदान मिळाले आहे. पण तरीही विरोधकांच्या ३० जागा जिंकून आल्या. विरोधकांनी माध्यमांसमोर रोज खोटे बोलण्याचा धडाका लावला होता. आपल्याला वाटले की, मतदारांवर याचा काही परिणाम होणार नाही. पण वास्तवात त्याचा प्रभाव मतदारांवर झाला. त्याचा फटकाही आपल्याला बसला. आपण विरोधकांच्या प्रचाराचा प्रभावीपणे सामना करू शकलो नाहीत.

“कोणाला बोलायची खुमखुमी…”, फडणवीसांनी शिंदे-पवारांसमोरच महायुतीच्या प्रवक्त्यांना खडसावलं; नेमका रोख कोणाकडे?

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीमधील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना केवळ १७ जागांवर विजय मिळविता आला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. एका अपक्षानेही काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची संख्या ३१ एवढी झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde points to voters on holiday for nda lok sabha setback in maharashtra kvg
Show comments