गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच विघ्नहर्ता राज्यात पाऊस पाडेल आणि आनंदाची बरसात करेल अशी मला अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची स्वप्नं साकार करण्यासाठी मी गणरायाला साकडं घातलं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
गोरगरीब जनता, पोलिसांसाठी घरं, गिरणी कामगारांच्या घरांसाठी लॉटरी असे अनेक चांगले निर्णय आम्ही लोकांसाठी घेतले आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यापैकी एकाही शेतकऱ्याला आम्ही सरकार म्हणून वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही नियम मोडून मदत केली आहे. १ रुपयात शेतकऱ्याला पिकवीमा मिळतो आहे. आम्ही बळीराजाच्या पाठिशी ठामपणे हे सरकार उभं आहे असंही यावेळी एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
आज गणपतीचं आगमन झालं आहे. मी सगळ्यांना मनापासून आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग सगळीकडे गणरायाचं आगमन झालं आहे. आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातल्या आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेवरचं, शेतकऱ्यावरचं, गोरगरीब जनतेवरचं अरिष्ट दूर होऊ दे असं साकडं मी आज देवाला घातलं आहे. आमच्या प्रयत्नांना विघ्नहर्ता बळ देईल असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
मागच्यावर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा झाला. यावर्षीही मी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जी मंडळं वर्षानुवर्षे शिस्तीने आणि नियमाने गणपती बसवतात त्यांना सरसकट पाच वर्षांची संमती द्यावी. लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले कारण लोक एकत्र आले पाहिजेत आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. आपण आजही तो उत्सव साजरा करतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.