शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा पाहायला मिळावी, अशी इच्छा शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री पाहायला मिळेल का? असं विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “फ्रेंडशिप डे हा सर्वांसाठीच असतो. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत.” दिल्लीत पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नीति आयोगाच्या बैठकीत कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची सविस्तर माहिती दिली आहे.
हेही वाचा- “आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला तरी शिवसेना सोडणार नाही”; सुनील राऊतांची प्रतिक्रिया
राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार असून आगामी निवडणुकीत ‘मिशन ४८’ साठी युती मजबुतीने काम करेल. तसेच राज्यातील विविध विकास कामांसाठी १८ हजार कोंटींचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तलाव सुधारण्यासाठी ६०० कोटींचा प्रस्ताव, नवी शहरं उभारणे, कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण आदी विषयांवर नीति आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
हेही वाचा- उदय सामंत यांचे हल्लेखोरांना पुन्हा आव्हान; म्हणाले, “मी तारीख आणि वार…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली असून महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा लवकरच मिळेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर राज्यातील विविध शाळांमध्ये ‘आपले गुरूजी’ उपक्रम राबवण्यात येणार असून वर्गांमध्ये शिक्षकांचे फोटो लावले जाणार आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.