महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यामध्ये मुक्ताईनगर येथील शिवसेनेचा मेळावा संपल्यानंतर कोथळीमधील मुक्ताबाई मंदिरात जाऊन मुक्ताईचं दर्शन घेतलं. यानंतर देवदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेलेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांना हसू अनावर झालं.
नक्की वाचा >> पत्राचाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”
दोनच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंसारखी वेशभूषा करणाऱ्या तोतयाच्या विरोधात खंडणी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मुळशीतील गुंड शरद मोहोळबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित केल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विजय नंदकुमार माने यांची स्पष्टीकरण देत हे फोटो आपण व्हायरल केले नसून मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा आपला कोणताही हेतू नसल्याचं म्हटलं आहे. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला.
नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”
“आपले डुप्लिकेट बरेच फिरत आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल होत आहेत. याचा त्रास होतो का तुम्हाला?” असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या बाजूलाच बसलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना हसू आलं. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न ऐकून घेतल्यानंतर हसतच उत्तर देताना, “ठीक आहे आता. त्या डुप्लिकेटने चांगलं काम केलं तर मला आनंद होईल. वाईट काम करु नये एवढंच वाटतं,” असं म्हटलं.