CM Eknath Shinde on Arvind Sawant Derogatory Statement : शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एन. सी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाणअयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल येथील गिल्डर लेन येथे उमेदवारी अर्ज भरताना सावंत यांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप शायना एन. सी यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यावरून शायना एन. सी यांनी संताप व्यक्त केला. तसंच, राज्यभरातील विविध राजकीय नेत्यांनी अरविंद सावंत यांच्यावर टीका केली.
हेही वाचा >> Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“उबाठाच्या एका खासदारांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्या संदर्भात केलेले विधान हे समस्त स्त्री जातीचा अपमान करणारे आणि उबाठाची वैचारिक पातळी दाखवणारे आहे. एका स्त्रीचा उल्लेख ‘माल’ असा करुन अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या पराक्रमी परंपरेला आणि पुरोगामी विचारसरणीला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. राजधर्म शिकवणाऱ्या माता जिजाईपासून तर समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंतची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. स्त्रीत्वाचा सन्मान आणि महिलांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा मराठी माणसाचा डीएनए आहे. आमच्यासाठी प्रत्येक महिला ही लाडकी बहिण असून तिची उन्नती, तिचा विकास, तिची प्रतिष्ठा आणि तिचा स्वाभिमान हाच आमचा ध्यास आहे. राजकारणापायी एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी गाठावी हे दुर्दैवी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उबाठाच्या एका खासदारांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्या संदर्भात केलेले विधान हे समस्त स्त्री जातीचा अपमान करणारे आणि उबाठाची वैचारिक पातळी दाखवणारे आहे. एका स्त्रीचा उल्लेख ‘माल’ असा करुन अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या पराक्रमी परंपरेला आणि पुरोगामी…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 1, 2024
शायना एन. सी काय म्हणाल्या होत्या?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “हे तेच अरविंद सावंत आहेत ज्यांच्यासाठी आम्ही २०१४, २०१९ मध्ये प्रचार केला. लाडक्या बहिणीप्रमाणे प्रचार केला. आता पाहा त्यांची मनस्थिती, विचार पाहा. ते जेव्हा म्हणतात ही महिला माल आहे. मालचा अर्थ आयटम. या शब्दाचा वापर तुम्ही केला माल, हेच मतदार तुम्हाला बेहाल करणार. सक्षम महिलेचा सन्मान करू शकत नाही, अपशब्द वापरले जातात.” त्या पुढे असंही म्हणाल्या की, “एका महिलेला माल म्हणणाऱ्यांचे जनता नक्की हाल करेल.”