लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. गेल्या १० दिवसांपासून ते उपोषण करत होते. त्यानंतर आज सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषण स्थळी जात त्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आता लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे. लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर निर्णय!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळाचा मान ठेवत उपोषण मागे घेतलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
शुक्रवारी यासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. त्यावेळी विविध मुद्द्यावर बोलणं झालं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आहे. आज सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे हाके यांनी शिष्टमंडळाचा मान ठेवत उपोषण मागे घेतलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात लक्ष्मण हाके हे गेल्या १० दिवसांपासून उपोषणाला बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( अजित पवार गट ) छगन भुजबळ तसेच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंसह अनेक नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. यादरम्यान, सरकार लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याची टीका करण्यात येत होती. त्यानंतर आज सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले.