Eknath Shinde on Raj Thackeray: माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेला उमेदवारी दिली गेली. त्यानंतर भाजपानेही सुरुवातीला मनसेला पाठिंबा दर्शविला. तसेच शिवसेना (शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. यानंतर राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडून शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हिसकावून एकनाथ शिंदे यांनी चूक केली, असा आरोप राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुलाखती आणि जाहीर सभांतून केला आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चांगले संबंध असताना अचानक मिठाचा खडा कसा काय पडला? याबाबत आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टिव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते इतकी टोकाची टीका शिंदे यांच्यावर का करत आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज ठाकरे यांनी काय बोलायचे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी काय बोलायचे, काय ठेवायचे, हे ते ठरवतील. त्यांच्याशी माझी नेहमीच समन्वयाची भूमिका राहिली आहे. ते माझ्याकडे कामे घेऊन यायचे, मी त्यांना मदत करायचो. पण आता निवडणूक असल्यामुळे माणूस भाषणात बोलतो, त्यावर मी फार विचार करत नाही.

हे वाचा >> Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, माझा त्यांच्याशी काही वादविवाद नाही. शेवटी त्यांनाही कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि आम्हालाही आमचे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत.

उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार का?

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ह गट पवार आणि पवार एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याप्रमाणेच शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र आलेले दिसतील का? असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा मानतो. त्यांची विचारधारा आता वेगळी झाली आहे. काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कधीही तयार झाले नसते. मात्र त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. २०२२ साली आम्ही राज्यातील जनतेच्या हिताचा मार्ग निवडला आहे आणि लोकांना रिझल्ट दिला आहे.” तसेच पुन्हा मातोश्रीवर जाणार का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, जर, तर याला आता अर्थ नाही.

हे ही वाचा >> Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!

महायुतीच्या १६०हून अधिक जागा निवडून येणार

शिवसेना (शिंदे) गटाच्या किती जागा येणार? यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एका पक्षाचे बोलत नाही. पण महायुती ही बहुमताने सरकार बनविणार. आमच्या १६० ते १७० जागा निवडून येतील. १६० च्या पुढे महायुतीचा आकडा जाणार.