CM Eknath shinde On Uddhav Thackeray : मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यापुढे राजकारणात एक तर तू राहशील, नाहीतर मी राहील, असं म्हणत त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाष्य करत त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
“आम्ही ज्यापद्धतीने राज्यात काम करतो आहे. ज्या पद्धतीने कल्याणकारी योजना आणतो आहे, त्या बघून उद्धव ठाकरे यांना पोटदुखी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बिथरले आहेत. अशा प्रकारची भाषणं माणूस तेव्हाच करतो, जेव्हा तो मानसिकदृष्ट्या गोंधळलेला असतो, मुळात महाविकास आघाडीचे सर्वच नेते आज गोंधळलेल्या अवस्थेत आहेत”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
“आव्हान देण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो”
“राजकारणात कुणी कुणाला कायमची संपवण्याची भाषा करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी बरंच काम केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी आहे. आज उद्धव ठाकरे आव्हानाची भाषा करत आहेत. मात्र, त्यापूर्वी आपण कुठं आहोत, याचा विचार त्यांनी करायला हवा. खरं तर आव्हानाची भाषणा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो. फुकटच्या गोष्टी करून कुणी कुणाला संपवू शकत नाही”, असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं.
“आम्ही कामाने उत्तर देऊ”
पुढे बोलताना, “आम्ही या राज्याच्या विकासावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आरोप करू द्या, आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “त्या गद्दारीचे सरदार कोण होते? हे देखील…”, सुनील तटकरेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. “मला आणि आदित्यला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे आता राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी त्यांना आव्हान देत आहे.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.